Mumbai Pune Corona Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,98,696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 767 दिवसांवर गेला आहे. 


आज धारावीत शून्य रुग्ण


आशिया खंडातील सर्वात मोठी दाटवस्ती असलेली झोपडपट्टी धारावीची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु झालेली पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये आज एकाही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून सध्या फक्त कोरोनाचे 22 सक्रीय रुग्ण राहिले आहेत.  याआधी 15 जून रोजी देखील धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. 


पुणे शहरात आज नव्याने 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुणे शहरात आज नव्याने 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 732 इतकी झाली आहे.शहरातील 329 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 337 झाली आहे.पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 734 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 93 हजार 608 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 783 रुग्णांपैकी 297 रुग्ण गंभीर तर 439 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 612 इतकी झाली आहे.


Mumbai Local : कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची मागणी, काय आहेत यामागची गणितं?


बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू


‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.