भिवंडी : स्वतःच्या रक्षणासाठी एक मुलगी मागील आठ महिन्यापासून भिवंडीत मुलगा म्हणून वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे.  गरीबीची परिस्थिती असल्याने पैसे कमवण्यासाठी ती पुण्याहून मुंबईला आली,  मात्र काम न मिळाल्याने भिवंडीत दाखल झाली. जे काही किरकोळ काम मिळेल ते करून  उदरनिर्वाह करत होती. जर काम मिळालं नाही तर इतरांनी केलेल्या मदतीने ती आपली भूक भागवत होती. भिवंडीत तब्बल आठ महिन्यांपासून ती मुलगा म्हणून वावरत होती. छाया दशरथ माने (वय 21 वर्ष)असे या मुलीचं नाव आहे. 


घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे कमावण्याच्या उद्देशाने कोणालाही न सांगता तिने आपलं घर सोडलं व मुंबईत आली. मात्र काम न मिळाल्याने ती कामाच्या शोधत भिवंडीत दाखल झाली. परंतु लॉकडाऊन असल्याने तिला काम काही मिळालं नाही. तरी तिने जिद्द सोडली नाही जे काही काम मिळेल ते काम ती करायची तसेच राहण्याची सोय नसल्याने  इमारतीच्या आडोशाला ती झोपायची. परंतु स्वतःचे रक्षण कसे करावे यासाठी तिने शक्कल लढवली अन् मुलगा बनली. स्वतःचे नाव तिने समीर शेख ठेवलं. तसेच स्वतःची वेशभूषा देखील तिने बदलली. मुलांसारखे केस लहान केले, त्यामुळे परिसरात कोणीही ओळखू शकलं नाही. इकडून तिकडून मिळालेली कामं करून तसेच इतर लोकांनी केलेल्या मदतीचे पैसे जमा करून  त्यातून ती आपली भूक भागवायची हे तिचं प्रतिदिनच दिनचर्या झाली होती.


परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये शांतिनगर परिसरातून पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे  विचारपूस करायला सुरुवात केली. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा सत्य समोर आलं की तो मुलगा नसून ती मुलगी आहे. हे समजल्यावर पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तिच्याकडून माहिती काढत तिचा घरचा पत्ता घेतला. तेव्हा तिने सांगितले की ती पुणे, हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे नाव छाया माने आहे.


तिच्या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्यांना समजले का मागील आठ महिन्यापासून ही मुलगी बेपत्ता आहे. त्यासंदर्भात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. तेव्हा पोलिसांनी दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात बोलावून या मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.