Milind Deora : मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता या चर्चा चुकीच्या असल्याचं स्वतः देवरा यांनी स्पष्ट केलं आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.
मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते माजी खासदारही आहेत. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. राज्यात जर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवण्याचं ठरवलं तर मिलिंद देवरा यांची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चाचपणी केल्याच्या चर्चा होत्या.
या सर्व चर्चा केवळ अफवा असून त्याचं आपण खंडन करत असल्याचं मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं त्यांनी सांगितलंय.
कोण आहेत मिलिंद देवरा? (Who Is Milind Deora)
मिलिंद देवरा हे दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. 2004 आणि 2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून आले होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते आहेत. पण काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या पक्षापासून दूर असल्याची चर्चा आहे.
मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचे या मतदारसंघात मोठं वर्चस्व होतं. या भागातील उद्योगपतींसोबतही त्यांचे विशेष संबंध होते. मुरली देवरा यांनीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा मतदारसंघ बांधला. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या मुरली देवरा यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी निसटता पराभव केला होता.
ही बातमी वाचा: