मुंबई : मध्य रेल्वेने मुंबईतील 'भेल' कंपनीच्या लोकल्स आपल्या सेवेतून बाद केल्या आहेत. 'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स' (BHEL) या इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या काही लोकल मुंबईत धावत होत्या.
12 डब्यांच्या एकूण आठ लोकल्स मध्य रेल्वेवर सुरु होत्या. मात्र आधुनिक बम्बार्डियर लोकल्स आल्यामुळे या जुन्या लोकल्स वापरात न आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. कधी गरज पडली, तरच या लोकला वापरण्यात येतील.
सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणाऱ्या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला. 2 फेब्रुवारीला दादर स्थानकात आग लागलेली लोकलही भेल कंपनीची होती.
रेल्वे सेफ्टी बोर्डाने 2014 मध्येच या लोकल बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र नवीन लोकल नसल्यामुळे तेव्हा या लोकल सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेता आला नाही.
2000 सालापासून या लोकल मुंबईकरांच्या सेवेत होत्या, मात्र त्यांची सर्विस थांबवल्यामुळे एक पर्व संपलं, असं म्हटलं जात आहे.