डावे नावापुरते, काँग्रेसने पोटनिवडणुकाच लढवाव्या : फडणवीस
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2018 12:31 PM (IST)
कर्नाटकात भाजपचं सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

मुंबई : त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान, भाजपाध्यक्षांसह पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. देशात 'डावे' फक्त नावाला उरले असल्याचा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलं. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.' असं फडणवीस म्हणाले. पूर्वीच्या केंद्र सरकारने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. वन, खनिज संपत्ती आणि सीमा भाग असल्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची राज्यं आहेत. मोदींनी सर्वप्रथम अॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार केली, त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना तयार करण्यात मोदींना यश आलं. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शाह यांचं कुशल संघटन कौशल्य यामुळे कार्यकर्ते जोडले गेल्याचं फडणवीस म्हणाले.