मुंबई, बंगळुरु,चेन्नई ह्या महानगरांमध्ये कार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मेट्रो सिटीत असलेला पार्किंगचा प्रश्न, ट्रॅफिक, ओला-उबरचा वाढता वापर, पेट्रोलचे वाढते भाव हे सगळं विचारात घेऊन, आता लोकांची कार विकत घेण्याची क्रेझ कमी झाली आहे.
मुंबईची आताची परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे, त्यामुळे जागोजागी ट्रॅफिकची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय, जिथे लोकांना राहायला जागा नाही, अशा मुंबईत कार पार्किंग करायला जागेची समस्या आ वासून उभी आहे.
कार विक्री कशा पद्धतीने कमी झाली?
- मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20.4 टक्के घट
- मुंबईत 2016 -17 साली कारची विक्री 1 लाख 22हजार एवढी होती
- पण 2017-18 साली कारच्या विक्रीत घट होऊन 97,224 वर आली
- बंगळुरु आणि चेन्नईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते
- बंगळुरुमध्ये कार विक्रीची घट 11.2 टक्के, तर चेन्नईमध्ये 4.5 टक्के आहे
खरंतर मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो येणार आहे, शिवाय अगदी कुठेही जायचं तर आता ओला-उबरचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी कमी वेळात, कमी पैशांत सोयीस्कर प्रवास सहज उपलब्ध असल्याने कार घेण्याची क्रेझ कमी झाली आहे. कदाचित मेट्रो कामामुळे, ट्रॅफिक प्रॉब्लेममुळे लोक सद्यस्थितीत जरी कार खरेदी करत नसले, तरी कारची विक्री पुढील काळात वाढेल, असा अंदाज विक्रेते वर्तवत आहे.
वाढती लोकसंख्या, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि ओला-उबरचा वाढता वापर, यामुळे मुंबईकर आपल्या सोईचा विचार करुन, आपल्याला खरंच ह्या गर्दीत कारची गरज आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारुन कार खरेदीपासून दूर गेला आहे. येणाऱ्या काळात जरी ह्या कार खरेदीबाबत संभ्रम असला तरी सद्यस्थितीत मुंबईकरांना कार खरेदी कुठेतरी दुय्यम वाटायला लागली आहे.