मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मनातील महापौर निवासावरुन मोठा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. महापौरांना हवा असलेला मलबार हिलमधील बंगला महापालिका काढून घेणारच असल्याची माहिती आहे.


मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण दराडे सध्या मलबार हिलमधील बंगल्यात राहतात. मात्र सध्या दादरमध्ये असलेलं महापौर निवास बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला दिल्यानंतर मलबार हिलचा बंगला आपल्याला मिळावा, अशी महाडेश्वरांची इच्छा आहे. त्यामुळे मलबार हिल येथील जल अभियंत्याचा बंगला ताब्यात घेण्यासाठी पालिकेचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

राहिले दूर घर माझे, मलबार हिलचा बंगला महापौरांना नाही?


मलबार हिलच्या बंगल्याला असलेली महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अधिभार लावून पाणी, वीज देयके वसूल करण्यात येणार आहे. आतापर्यंत पल्लवी दराडे, प्रविण दराडे यांच्या ताब्यातील बंगल्यासाठी मेंटेनन्सचा खर्च महापालिका करत होती, मात्र यापुढे तो करणार नाही, अशी कठोर भूमिका गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली.

राज्य सरकारने बंगला ताब्यात घेऊ नयेत असे निर्देश दिल्याने पालिकेची अडचण झाली होती. मात्र पालिकेनं  शासनाविरोधात दंड थोपटले असून लवकरच हा बंगला ताब्यात घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच महापौरांच्या बंगल्याचा गुंता सुटण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई महापौरांचा बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यामुळे पालिकेला महापौरांना पर्यायी निवासस्थानची व्यवस्था करावी लागणार आहे. भायखळा येथील राणी बागेतील बंगला महापौरांनी नाकारला होता.

मलबार हिल येथील पालिकेच्या जल अभियंत्यांच्या बंगल्याचा पर्याय सुचविण्यात आला. मात्र मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्यात सनदी अधिकारी राहत आहेत. त्यामुळे हा बंगला रिकामा करण्यास अडथळे येत आहेत. भाजप वगळता शिवसेनेसह विरोधकांनी बंगला रिकामा करण्याची जोरदार मागणी लावून धरली होती.