Pravin Darekar, Mumbai Bank : बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. इतकी वर्ष झाली तरी तपास सुरूच आहे? त्यामुळे कस्टडीची गरज नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसेच, प्रवीण दरेकरांना जामीन मंजूर होणं म्हणजे, दरेकरांविरोधात चौकशी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच, अटक झाल्यास 50 हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत. 


मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची चौकशी झाली होती. दरेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तर, उच्च न्यायालयात सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे हायकोर्ट दरेकरांना दिलासा देणार की, अटकपूर्व जामीन फेटाळणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. अशातच सुनावणीनंतर हायकोर्टानं दरेकरांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 


काय आहे प्रकरण?


प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.


काँग्रेसचा दरेकरांवर हल्लाबोल 


भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रवीण दरेकर सध्या बोगस मंजूर प्रकरणी अडचणीत आले आहेत. यावरुन भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 'एकाचवेळी मजूर, आमदार, व्यावसायिक दाखवणारे प्रवीण दरेकर श्री 420 आहेत. त्यांची जागा तुरुंगात आहे. प्रति मजूर संस्थेत प्रवीण दरेकर हे 'मजूर रंगारी' असल्याचे दाखवले आहे. यांनी रंगारी म्हणून मागील अनेक वर्षात भाजपला चुना लावण्याचे काम केले. नरेंद्र मोदी, अमित शाहा व फडणवीस यांना 'चुना' लावला आहे, असा हल्लाबोल भाई जगताप यांनी केला आहे.