मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना फोन वरुन धमक्या देण्यात आल्याने खळबळ माजली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत या नेत्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. याचाच तपास मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात असताना या सर्व नेत्यांना धमकी देणारा एकच व्यक्ती असून त्याला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपीचं नाव पलाश बोस असून तो 49 वर्षांचा आहे. पलाश बोसने या धमक्या का दिल्या याचं कारण मुंबई एटीएस शोधत आहे. मात्र, संजय राऊत यांना धमकी देण्याच्या वेळी सुशांत प्रकरणापासून लांब राहण्याचा इशारा त्याच्याकडून देण्यात आला होता. तसेच मातोश्रीवर फोन करुन मातोश्रीला बॉम्बने उडवण्याची धमकी या व्यक्तीकडून देण्यात आली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नागपूर आणि मुंबई कार्यालयात फोन करुन तर शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पलाश बोसने धमक्या दिल्या होत्या.
कोण आहे पलाष बोस?
- 49 वर्षीय पलाष कोलकत्याच्या टॉलिगुंग येथे राहणार आहे.
- 1999 ते 2018 पर्यंत तो दुबईमध्ये राहत होता.
- पलाष बोस स्वतःला फिटनेस ट्रेनर सांगायचा.
- भारतात परतल्यानंतर त्याच्याकडे असलेले दुबईचे तीन सिमकार्ड त्याने चालूच ठेवले.
- सिल्वर डायल या ॲपद्वारे पलाषने व्हर्चुअल कॉलिंगद्वारे या बड्या नेत्यांना धमक्या दिल्या.
- संजय राऊत यांना व्हिडियो कॉलद्वारे धमकी देण्यात आली होती.
पलाष ने संजय राऊत यांच्या घराचा पत्ता, त्यांचा दिनक्रम, तर कुटुंबाची संपूर्ण माहिती मिळवली होती. ही माहिती तो का गोळा करत होता याचा तपास एटीएसकडून लावला जात आहे. तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला मातोश्रीची संपूर्ण माहिती पलाष गुगलद्वारे घेत होता. मातोश्री निवासस्थानात जाण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत. मातोश्रीला जोडणारा रस्ता कुठे जातो. या सर्वांची माहिती पलाष गुगलद्वारे घेतली जात होती. एका प्रकारे मातोश्रीची ऑनलाइन रेकी हा पलाश करत होता.
शिवसेना नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकास अटक
अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत
पलाष हे सगळं का करत होता आणि या मागचा त्याचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, त्यानं केलेलं हे कृत्य राजकारण्यांची चिंता वाढवणारं आहे. इतर अजून कुठल्या नेत्यांची माहिती पलाषने गोळा केली होती का? त्याच्यावर अजून कुठे गुन्हे दाखल आहेत का? इतके वर्ष दुबईमध्ये राहिल्यानंतर त्याचा दाऊदशी किंवा कुठल्या अंडरवर्ल्ड गँगशी संबंध आहे का? याचा तपास मुंबई एटीएसकडून केला जात आहे. पलाशला पकडण्यासाठी मुंबई एटीएसचे अधिकारी दया नायक यांनी त्यांच्या नेतृत्वात एक टीम निवडली आणि नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू केला. या टीमने आठवड्याभराच्या आतच या प्रकरणाचा छडा लावला. मात्र, अजूनही असे बहुतांश प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरं एटीएसला पलाशकडून हवी आहेत.
Threat to Sanjay Raut | संजय राऊतांना धमकी देणाऱ्या पलाष घोषला एटीएसकडून कोलकात्यात अटक