मुंबई : काही गोष्टी घेण्यात नाही, तर देण्यात आनंद असतो, असं भाष्य करुन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी लतादीदींना टोला लगावला आहे. 'ए मेरे वतन के लोगो, या गाजलेल्या गाणं नेमकं कुणाचं, आपलं की लतादीदींचं असा प्रश्न विचारल्यावर आशाताईंनी हे उत्तर दिलं.
पद्मविभूषण आशा भोसले यांचा येत्या 8 सप्टेंबरला 85 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात काल (5 सप्टेंबर) 'आपल्या आशाताई' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आशाताईंची प्रकट मुलाखत घेतली.
स्वभावाप्रमाणे आशाताईंनी त्यांच्या खास शैलीमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली. आपल्या आयुष्यातील अनेक चढउतार त्यांनी बोलून दाखवले. राजकारण्यांबाबत विचारलं असता, मला माझ्या घरातलेच राजकारण सांभाळता आलं नाही, असं त्या म्हणाल्या. 'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याच्या वादाबद्दल विचारले असता, काही गोष्टी घेण्यात नाही तर देण्यात आनंद असतो, असं म्हणत त्यांनी लतादीदींना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.
यावेळी आशाताईंनी सुधीर फडके, लता मंगेशकर यांची नक्कलही करुन दाखवली. तसंच 'जिवलगा', 'दिल चीझ क्या है', 'पूछो न यार क्या हुआ' ही गाणीही गायली.