कल्याण : सर्वाधिक घाणेरड्या रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचा दोन वेळा समावेश झाल्यानंतर अखेर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. कल्याण स्थानकाला लागलेला अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी स्थानिक खासदार आणि रेल्वे अधिकारी कामाला लागले आहेत.


स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मध्य रेल्वेचे डीआरएम एस. के. जैन यांनी काल कल्याण रेल्वे स्थानकाचा दौरा केला. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यासमोर रेल्वे स्थानकातील असुविधांचा पाढाच वाचला. अस्वच्छता, फेरीवाले, पुलाची रेंगाळलेली कामं अशा समस्या प्रवाशांनी खासदार आणि डीआरएम यांच्यासमोर मांडल्या.


यावेळी अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि खासदार दोघांनीही पुढाकार घेतला. कल्याण रेल्वे स्थानकात सध्या 60 सफाई कामगार कार्यरत असून त्यांच्याकडून होणारी रेल्वे स्थानकाची स्वच्छता पुरेशी नाही.


कल्याण स्थानकाची निगा राखण्यासाठी आता सफाई कामगारींची संख्या वाढवून 150 वर नेण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण स्थानक टॉप 20 मध्ये असेल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.