मुंबई: गुढी पाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुंबईतील मशिदींरच्या भोंग्यांचे आवाज कमी झाल्याचं सांगितलं जातंय. पण आवाजाची ही पातळी राज ठाकरेंच्या भाषणाच्या आधीपासूनच कमी करण्यात आली असून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशिदीच्या आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे पालन करण्यात येत असल्याची माहिती मुंबई अमन समितीचे अध्यक्ष फरीद शेख यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि मशिदीच्या भोंग्याच्या आवाजाच्या कमी पातळीचा कोणताही संबंध नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
अजानसाठी मुंबईतील मशिदीतील लाऊडस्पीकरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आधीपासूनच करण्यात येत असल्याचं फरीद शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींच्या भोंग्यासंबंधी वक्तव्य केलं होतं.
फरीद शेख आणि मुस्लिम प्रतिनिधींनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुरुवारी भेट घेतली. या बैठकीत विविध मशिदींचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि विशेष शाखेचे डीसीपी उपस्थित होते.
भांडुप सोनापूर परिसरातील एका मशिदीला ध्वनिप्रदूषणासंबंधी नोटीस देण्यात आली होती. शेख यांनी सांगितले. त्यानंतर या मुस्लिम प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पवित्र रमजान महिना शांततेत साजरा झाला पाहिजे त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका या प्रतिनिधींनी घेतली. पोलीस आयुक्तांनी प्रत्येक क्षेत्रातील मुस्लिम नेत्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तयार केला आहे.
मुंबई पोलिसांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर डेसिबल पातळीपेक्षा कमी ठेवण्यास आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले. शहरातील अनेक भागांमध्ये या भोग्यांचा आवाज आधीच डेसिबलच्या पातळीपासून खाली आला होता.
महत्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray On Mosque: 'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', राज ठाकरे यांचा इशारा
- गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
- राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम, कोणत्याही ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही; गुलाबराव पाटलांची बोचरी टीका