Mumbai Airport Maintenance: छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport Maintenance) दोन्ही धावपट्ट्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज  (2 मे) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान दुरुस्ती होणार आहे. सुमारे 800 पेक्षा अधिक विमानसेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. 


हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामातील महत्त्वाच्या टप्प्याचे काम आज हाती घेणार  आहे. त्यामुळे सकाळी 11 ते  संध्याकाळी 6 या ने पर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. विमानतळावरील दोन्ही धावपट्टी (09/27 आणि 14/32) दुरुस्तीच्या कामासाठी सहा तास बंद राहणार आहे.


विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा नंतर पुन्हा विमानांच्या  उड्डाणांना सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त सिंगल रनवे एअरपोर्ट आहे. दिवसभरात या विमानतळावरून 900 विमानांचे उड्डाण होते. अशा परिस्थित विमानतळ सहा तासांसाठी बंद राहणार आहे.  मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली 


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक भागधारकांच्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना तयार केली आहे. पावसाळ्यापूर्वी धावपट्टीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून पावसळ्यात उड्डाणात कोणताही अडथळा येणार नाही.  काही कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत तर काही विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.  धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील. या कामांमुळे प्रवाशांनी आरक्षित केलेल्या विमान सेवांबद्दल संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी.  


प्रवाशांची गैरसोय नाही


मुंबई विमानतळाने प्रवाशांचे गैरसोय होऊ नये म्हणून विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांसह धावपट्टी देखभालीच्या कामाचे नियोजन केले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार नियोजन करण्यास मदत झाली आहे.


सर्वोत्तम 100 विमानतळांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश


छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, सांताक्रूझ  उपनगरांमध्ये सुमारे 1450 एकर परिसरात पसरलेले आहे. मुंबईचे हे विमानतळ वर्षाला सुमारे अडीच कोटी प्रवाशांना सेवा देते   जगातील 100 सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत भारतातील चार विमानतळांचा समावेश झाला आहे. सर्वोत्तम 100 विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.