मुंबई : मुंबईतील (Mumbai News) वाढत्या वायू प्रदूषणाला (Air Pollution) कारणीभूत ठरणाऱ्या भुलेश्वर येथील झवेरी बाजारात मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. सोने-चांदी व्यावसायिकांच्या भट्टी, चिमण्यांमधून निघणारा धूर वायुप्रदूषणास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने या धुरांड्या, चिमण्या, भट्टी निष्कासित केल्यात. तसंच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.  


मुंबईला सोन्याची नगरी अशी ओळख देणारा झवेरी बाजार आहे. देशातील सर्वात मोठे सोन्या-चांदीचे व्यवहार इथं होतात. पण मुंबईतली सोन्याची झळाळी आता मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे. कारण  झवेरी बाजारातील कारखान्यात सोने बनवणाऱ्या या कारखान्यांच्या धुरामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तब्बल तीन हजारांपेक्षाही अधिक सोन्याच्या दागिन्यांवर काम करणारे कारखाने 24 तास सुरु आहेत. त्यामुळे भूलेश्वर, काळबादेवी, मुंबा देवी, सीपी टँक परिसरासह  पूर्ण गिरगाव परिसर या अनधिकृत कारखान्यांच्या  धुरामुळे त्रासला आहे. 


अनधिकृत कारखान्यांच्या संख्येत वाढ


गेल्या काही वर्षांमध्ये या अनधिकृत कारखान्यांच्या संख्येत वाढ झालीय. तब्बल 22 वर्षांपासून याविरोधातली लढाई सुद्धा उच्च न्यायालयात सुरु आहे. पण याचिकाकर्त्यांच्या नशिबात तारखेशिवाय दुसरं काहीच आलं नाही.  या अनधिकृत कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणाऱ्या धूरामुळे  अनेकांना आपलं राहतं घर सोडण्याची वेळ आली आहे. आातपर्यंत दोन ते अडीच लाख नागरिकांनी दुसऱ्या शहरात स्थलांतर केल्याचं  इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.


55 टक्के नागरिकांना दमा आणि श्वसनाचे आजार


या व्यवसायाशी संबंधित 38  मजुरांचा गेल्या 13  वर्षांत मृत्यू झाला आहे. 2001 मध्ये इथल्या कारखान्यात स्फोट झाल्याने 24  मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेव्हाचे अतिरिक्त  आयुक्त अजितकुमार जैन यांनी रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार भुलेश्वर परिसरातले
सर्व कारखाने अंजीरवाडी आणि माजगाव औद्योगिक क्षेत्रांत स्थलांतरीत करण्याचा सूचना दिल्या आहेत. 2005 मध्ये केईएम रुग्णालयाच्या सर्व्हेनुसार इथल्या 55 टक्के नागरिकांना दमा आणि श्वसनाचे  आजार आहेत.  


2014 मध्ये भुलेश्वर रेसिडेंट असोसिएशनकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ही समस्या ठेवण्यात आली होती. त्यांनीही हे कारखाने तात्काळ हलवण्याचे आदेश दिले होते पण त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता स्थानिकांच्या  या  मागण्या पूर्ण होतात का? आणि या अनधिकृत कारखान्यांवर कारवाई होते का? हे पाहावं लागेल.


हे ही वाचा :


Health Tips : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो; तणाव, चिंता, नैराश्य वाढण्याची भीती