Jitendra Navlani : ईडी अधिकाऱ्यांसाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लूक आऊट नोटीस जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यानंतर नवलानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.


काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडी अधिकाऱ्यांवर वसुली करत असल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी जितेंद्र नवलानीचा उल्लेख केला होता. नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांसाठी वसूली करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नवलानी विरोधात एफआयआर दाखल केला आहे. याबाबतची माहिती नवलानीला याआधीच देण्यात आली. त्यानंतर नवलानीने भारतातून पळ काढला असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवलानी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 मे रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 7 (अ) आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला होता. नवलानी याने मुंबई आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिकांकडून 59 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. नवलानीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर 24 तासातच लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती ACB च्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याआधी नवलानी याला जबाब नोंदवण्यासाठी आणि चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


नवलानी विरोधात पुरावे?


एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलानीवर असलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. नवलानी याने ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून वसुली केली की खरंच तो ईडी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, याचीदेखील चौकशी करण्यात येत आहे. ACB च्या  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  नवलानी सोबत काम करणाऱ्यांपैकी काहींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याशिवाय केलेल्या चौकशीत एसीबीला नवलानीविरोधात पुरावे आढळले आहेत. या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे नवलानीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


पैसे कसे जमा केले?


एसीबीने नोंदवलेल्या एफआयआर नुसार, जितेंद्र नवलानीने सल्लागार शुल्क अथवा कर्जाच्या स्वरुपात हे पैसे जमा केले होते. त्यानंतर त्याने हे पैसे वेगवेगळ्या शेल कंपन्यांच्या नावावर जमा केले. या शेल कंपन्यावर नवलानीचे नियंत्रण आहे. नवलानीने वर्ष 2015 ते 2021 दरम्यान या काळात अशा प्रकारे पैसे जमा केले असल्याचा दावा ACB ने केला आहे. 


दरम्यान, याआधी शिवसेनेच्या एका नेत्याने जितेंद्र नवलानीची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.त्यानंतर याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले. या पथकानेदेखील नवलानीला चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते.