Mumbai Aarey Metro Carshed: मुंबईतील आरे मेट्रो कारशेडसाठी एकही झाड तोडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, जमिनीवरील परिस्थिती वेगळी असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागला आहे. आरेतील कारशेडच्या जमिनीच्या एका भागावर असलेली झाडे जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोमवारी, आरे परिसरातील मुख्य मार्गांवरील काही झाडे छाटणी करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी गोरेगाव चेक नाका ते पवईला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला. मेट्रोचे कोच आणण्यासाठी झाडांची छाटणी सुरू असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. आरे कारशेडच्या जागेवरील झाडांना हात लावण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सरकारी यंत्रणांनी केलेले दावे फोल असल्याचे समोर आले आहे. आरेमधील रस्ते बंद करून झाडे छाटली जात असल्याचे सांगण्यात आले. मेट्रोच्या बोगींना या मार्गावरून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा नको यासाठी हे काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
आरे कन्झर्वेशन ग्रुपने आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी असलेली झाडे जेसीबीच्या मदतीने पाडण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. ही दृष्ये सोमवारी असल्याची माहिती आहे.
तर, सोमवारीच आरेतील मेट्रो कारशेडची जागा असलेला एक भाग हा जेसीबीच्या मदतीने सपाट करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमकं या ठिकाणी काय घडलं असावं याबाबत प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिल्यानंतर माहिती समोर येईल, असे 'आरे वाचवा' मोहिमेतील कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आज आरे कॉलनीमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरेतील पिकनिक स्पॉटवरही मोठा बंदोबस्त होता.
दरम्यान, सोमवारी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चार पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री त्यांची सुटका करण्यात आली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच विविध संघटनांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने ही पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यांनाही सायंकाळी 5.30 ते 6 वाजे दरम्यान सुटका करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी रात्री कार्यकर्त्यांची सुटका केली.