मुंबई : रिक्षाला धडक दिल्यानंतर बाईकस्वारासोबत झालेल्या वादावादीत मध्यस्थी करणाऱ्या रिक्षातील प्रवाशाला प्राण गमवावे लागले. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला. दोघा मद्यपी बाईकस्वारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
53 वर्षीय यशोधर शेट्टी रविवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत दहिसरच्या रेस्टॉरंटमध्ये आयपीएलची फायनल पाहण्यासाठी गेले होते. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बोरीवलीतील निवासस्थानी जाण्यासाठी ते निघाले. रिक्षा पकडून शेट्टी मित्रांसोबत निघाले, तेव्हा दहिसर टोलनाक्याजवळ त्यांच्या रिक्षाला एका बाईकने धडक मारली.
रिक्षा फारशी वेगात नसल्यामुळे कोणालाच फारसा हादरा बसला नाही, किंवा कोणी जखमीही झालं नाही. मात्र होंडा अॅक्टिव्हावरुन जाणाऱ्या दोन्ही मद्यपी बाईकस्वारांनी या प्रकारासाठी रिक्षाचालकाला जबाबदार ठरवलं. बाईकस्वारांनी रिक्षाचालकासोबत वाद घालायला सुरुवात केली.
यशोधर शेट्टी दोघांच्या वादात मध्ये पडले, त्याचवेळी प्रकरण चिघळलं आणि मद्यपान केलेल्या बाईकस्वारांनी शेट्टींना मारहाण केली. वादावादी पाहून मोठी गर्दी जमा झाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी प्रकरण सोडवलं. शेट्टी आणि आरोपींना दहिसर पोलिस स्थानकात नेण्यात आलं.
पोलिसांकडून दोन्ही बाजू पडताळून पाहण्यासाठी चौकशी सुरु झाली, त्याचवेळी शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागलं. पोलिस स्थानकातच शेट्टींनी उलटी केली आणि त्यांची शुद्ध हरपली. पोलिसांनी तात्काळ त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी यशोधर शेट्टी यांना मृत घोषित केलं.
शेट्टी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खूणा नाहीत. त्यामुळे पोस्टमार्टम अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
मद्यपी बाईकस्वारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती झोन 7 चे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. 25 वर्षीय आरोपी साहिल अरोरा रिअल इस्टेट एजंट आहे, तर 21 वर्षीय आरोपी भूषण बनसोडे सेल्समन म्हणून कार्यरत आहे.
बाईकस्वार-रिक्षाचालकाच्या वादात पडलेल्या प्रवाशाने प्राण गमावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 08:40 AM (IST)
रिक्षाला धडक दिल्यानंतर बाईकस्वारासोबत झालेल्या वादावादीत मध्यस्थी करणाऱ्या रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -