मुंबई : अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीच्या पोटातून 32 इंच लांबीचा केसांचा पुंजका बाहेर काढण्यात आला आहे. मिरा रोडमधील हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. गेल्या वर्षांपासून या मुलीला स्वतःचेच केस खाण्याचा विकार जडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोटात केसांचा गोळा झाल्यामुळे संबंधित बालिकेला काही खाणं किंवा पिणंही मुश्किल झालं होतं. पोटदुखी आणि अस्वस्थ वाटत असल्याचं तिने पालकांना सांगितलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दिवसातून एकदा तरी तिला मळमळायचं, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. परीक्षेच्या भीतीमुळे हे होत असावं, असा अंदाज तिच्या पालकांनी बांधला. तिने खाणं-पिणंच बंद केल्यामुळे अखेर आई-वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
बालिकेला ट्रायकोटिलोमेनिया (हेअरपुलिंग डिसॉर्डर) आणि ट्रायकोफेगिया (रापुंझेल्स सिंड्रोम) झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचेच केस तोडून खाते. केसांच्या पुंजक्याचा आकार पाहता ती बऱ्याच वर्षांपासून ते खात असावी, असा डॉक्टरांचा कयास आहे.
4 नोव्हेंबरला डॉक्टरांनी 32 इंच लांबीचा केसांचा अख्खा पुंजका बाहेर काढला. या गोळ्याने तिचं पोट आणि लहान आतड्याचा संपूर्ण भाग व्यापला होता.
बालिकेला समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. ताण-तणावातून हा विकार जडत असल्याचं मानसशास्त्रीय संशोधन आहे.
आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. पण आतापर्यंत घरातील कोणीही तिला केस खाताना पाहिलेलं नाही. असा काही आजार असेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती, असं चिमुरडीच्या पालकांनी सांगितलं.
जगभरातील वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारच्या 120 पेक्षाही कमी केसेसची नोंद झाल्याची माहिती आहे.