मुंबई : मुंबईतील 30 टक्के शाळकरी विद्यार्थी सिगरेटच्या विळख्यात अडकले असून त्यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण 14 टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रिन्स अली खान हॉस्पिटलने केलेल्या सर्व्हेमध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


उडता पंजाब या सिनेमानं ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबच्या तरुणाईचं चित्र तुमच्या-आमच्यासमोर ठेवलं.  त्याचप्रमाणे मुंबईतील अल्पवयीन मुलं आणि मुलींनाही सिगरेटचं व्यसन जडल्याचं सर्वेक्षण पालकांचे डोळे खाडकन उघडणार आहे.

काय आहे निष्कर्ष :

30 टक्के शाळकरी मुलं तंबाखू खात किंवा सिगारेट ओढत असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे 14 टक्के मुलींना हे व्यसन जडलं आहे. या विद्यार्थिनी ई-सिगारेट, हुक्का ओढत असल्याचं यात उघडकीस आलं. विशेष म्हणजे काही मुली तंबाखू मिळवून त्याचं सेवन करत आहेत.

टाटा कॅन्सर हॉस्पिटल नंतर मुंबईत क्रमांक दोनवर असलेल्या प्रिन्स अली खान कॅन्सर रुग्णालयाने मुंबईतल्या 30 शाळांमध्ये एक सर्वेक्षण केलं. मुंबईत वाढत चाललेल्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला होता. या अंतर्गत तीस शाळांतल्या इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत मुंबईतल्या 30 शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. माझगाव भागातल्या शाळांतून प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या टीमने हा सर्व्हे केला.