मुंबई : गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अचानक विजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होतं. परंतु, मुंबईतील ब्लॅक आऊटसंदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानंतर खळबळ माजली आहे. मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलं आहे.
यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत पूर्ण दिवस विजपुरवठा खंडीत झालेल्या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता. सायबर सेलकडून अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल गृहविभाग ऊर्जा विभागाला सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर अभियानचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणं हा होता. इतकंच नाही चीनने अशी योजना बनवली होती की, जर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला तर संपूर्ण देशाला संपूर्ण अंधारात लोटलं जाईल.
हिमालयात सुरु असलेल्या कारवायांदरम्यान चिनी मालवेअरने भारतातील वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत घुसखोरी केली होती. यामध्ये हायवोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टचाही समावेश होता, असंही न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरने (Recorded future) केला आहे. पण यातील काही मालवेअर अॅक्टिव्ह झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी रेड एकोने (Red Echo) सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचुप पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं.
काय झालं होतं मुंबईत 12 ऑक्टोबरला?
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली होती. बेस्ट, अदानी, एमएसइबीच्या भागात वीज नव्हती. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून प्रवासी अडकले होते. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली होती. याशिवाय रुग्णालयांमधील वीजपुरवठाही खंडित झाल्यानं ऐन कोरोनाच्या काळात रुग्णांना गैरसोयीचा फटका बसला होता.
मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती, असं सांगण्यात आलं होतं. लाईट गेल्यामुळे अनेक ठिकाणची लोकल सेवा देखील खंडीत झाली होती.
वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला होता. अनेक विद्यार्थ्यांच्या त्यादिवशी परीक्षा होत्या. त्यामुळे वीज गेल्यानं पालक आणि विद्यार्थी चिंतेत होते. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर सकळी 11 ते 12 या वेळेत होते. अचानक विजपुरवठा खंडीत झाल्यानं घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई ठप्प झाली होती. याचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवरही झाला होता. विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :