मुंबई : मागील वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर चीनने भारतात सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सायबर हल्ल्याचा संबंध थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही तास झालेल्या ब्लॅकआऊटशी आहे. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यात संपूर्ण शहरातील बत्ती गुल झाली होती आणि ऐन कोरोनाच्या काळात रुग्णालयं जनरेटरवर कार्यरत होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.


गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्याने लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्याने दोन कोटी मुंबईकर अंधारात होते. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरु करावा लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरु राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता.


मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅकआऊट झालं होतं. आतापर्यंतच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, या सर्व घटना एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. त्यावेळी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधूल झालेला सायबर हल्ला असू शकतो असा दावा भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने काही वृत्तात म्हटलं होतं.


न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर अभियानचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणं हा होता. इतकंच नाही चीनने अशी योजना बनवली होती की, जर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला तर संपूर्ण देशाला संपूर्ण अंधारात लोटलं जाईल.


मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत


वीज नसल्यानं जनरेटर बंद, व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू,मुलुंडच्या Apex Covid हॉस्पिटलमधील घटना



हिमालयात सुरु असलेल्या कारवायांदरम्यान चिनी मालवेअरने भारतातील वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत घुसखोरी केली होती. यामध्ये हायवोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टचाही समावेश होता, असंही न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरने (Recorded future) केला आहे. पण यातील काही मालवेअर अॅक्टिव्ह झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी रेड एकोने (Red Echo) सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचुप पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं.


मुंबई अंधारात, रुग्णालयं जनरेटरवर
मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जवळपास दोन ते तीन तास अंधारात होती. मुंबई महानगर क्षेत्रात पॉवर ग्रीड यंत्रणेत बिघाड झाला होता. दक्षिण मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टने (BEST) म्हटलं होतं की, वीजपुरवठा करणाऱ्या प्लांटमध्ये बिघाड झाला आहे. याशिवा महावितरणकडून होणारा वीज पुरवठाही खंडित झाला होता. परिणामी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम, उपनगर आणि ठाण्यातील काही भागात अंधारात गेले होते. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. बिघाड झाल्याने मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनही आहे त्या ठिकाणी उभ्या होत्या. तर याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. रुग्णालयातील वीज गेल्याने जनरेटरवर व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.