मुंबई: महायुतीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (mukhyamantri mazi ladki bahin yojana) योजनेच्या लाभार्थी नोंदणीला आजपासून प्रारंभ झालाय. 21 ते 60 वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे. योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली. योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला आल्या होत्या. या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रांवर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली. या योजनेतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रूपये मिळणार आहेत. 


मध्य प्रदेश सरकारच्या 'लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला होता. भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार किंवा मिळणार नाही,याबाबत महिलावर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे महिलावर्गात काहीसा संभ्रम आहे. 


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना


* वय 21 ते 60 वर्षे
* दरमहा 1500 रुपये मिळणार
* दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 


कोण असणार पात्र?


* महाराष्ट्र रहिवासी 
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल


अपात्र कोण असेल?


* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )



लागणारी कागदपत्रे 


आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो


योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.