मुंबई: भल्या मोठ्या ट्रॅफिकच्या गर्दीत सायरन वाजत उभी असलेली अॅम्ब्युलन्स, असं चित्र मुंबईत बऱ्याच ठिकाणी दिसतं. मात्र आता हे चित्र काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता रस्त्यांवर ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ पाहायला मिळणार आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकारने बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. प्रथोमपचारासाठी जे जे आवश्यक असेल, ते ते सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये असेल.



महत्त्वाचं म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असणार आहे.

गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकपाठोपाठ ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य ठरलं आहे.  सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर बाईक अॅम्ब्युलन्स सुरु कऱण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य शहरांतही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करण्यात येतील, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं.



याबाईक अॅम्ब्युलन्स सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या भागात या बाईक अॅम्ब्युलन्स असतील.

अॅम्ब्युलन्ससाठी 108 क्रमांकावर फोन आल्यानंतर, त्या त्या भागात जवळ असलेली बाईक अॅम्ब्युलन्स संबंधित ठिकाणी धाव घेईल.

याबाईक अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हातळण्यास सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे.

अनेकवेळा अॅम्ब्युलन्स पोहोचूनही मोठ्या ट्रॅफिक जॅममुळे वाटेतच अडकून राहते. अशावेळी काहीही करता येत नाही. त्यामुळे रुग्णाला शक्य असूनही उपचार करता येत नाहीत, किंवा उपचारास विलंब होतो. आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या तासाभरात उपचार मिळणं आवश्यक असतं. ते न मिळाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र अशा ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ आता महत्त्वाच्या ठरणार आहेत.



बाईक अॅम्ब्युलन्समुळे मोठा त्रास वाचणार आहे. अॅम्ब्युलन्सचा नंबर डायल केल्यावर बाईक अॅम्ब्युलन्स आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यानंतर बाईक अॅम्ब्युलन्सवरी डॉक्टर उपचार करतील.

सुसज्ज बाईक अॅम्ब्युलन्समध्ये काय काय असेल?

  • प्रथमोपचाराची आवश्यक साधने

  • आपत्कालीन उपाचार साहित्य

  • हार्ट अटॅकवेळी द्यावयाची औषधं

  • ऑक्सिजन मास्क

  • विविध इंजेक्शन, गोळ्या

  • भाजलेल्या, बुडालेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार साहित्य