मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतून 11 लाख मतदारांची नावं गायब झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती. यावरुन बराच गाजावाजाही झाला. पण असं   असलं तरी निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीचे प्रमाण अत्यल्प असल्याचं  समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही बाब समोर आणली आहे.


मुंबई महानगरपालिका निवडणूकीत 11 लाखांहून अधिक मतदारांची नावे गायब असल्याची बाब समोर आली होती. पण असं असलं तरीही याविषयी तक्रारीचे अवघे 63 अर्ज करण्यात आले आहेत.

2017च्या पालिका निवडणूकीत मतदार यादीच्या बाबतीत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत? अशी माहिती अनिल गलगली यांनी पालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे विचारली होती.

यावर गलगली यांना यासंबंधी माहिती कळविण्यात आली की, मतदार यादीच्या तक्रारीबाबत अद्यापपर्यंत फक्त 63 अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्ष 2012 आणि वर्ष 2017च्या निवडणूकीत एकूण मतदाररांची संख्या 1,02,86,579  आणि 91,80,555 अशी आहे. वर्ष 2012च्या तुलनेत वर्ष 2017 च्या पालिका निवडणूकीत 11 लाख 6 हजार 24 अशी मतदारांच्या संख्येत तफावत होती. असे असताना निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीचे फक्त 63 अर्ज आले आहेत. त्यामुळे आजही मतदार आपल्या अधिकाराबाबत गंभीर नसल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या: