मुंबई : निवासी डॉक्टरांच्या संपानंतर सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांवर नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे. यापुढे रुग्णालयाचे डीन अर्थात अधिष्ठातांना त्यांच्या संस्थेची दर दिवशी दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाही तर या पाहणीचा व्हिडीओ तयार करुन तो मंत्रालयात संबंधित विभागाला पाठवायचा आहे.
राज्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी हे आदेश दिले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
या व्हिडीओमध्ये सर्व आयसीयू, आपत्कालीन कक्ष, प्रवेश आणि बाहेर पडण्याचा गेट तसंच ड्युटीवरील सुरक्षारक्षक हे सगळं आलं पाहिजे, असंही सांगण्यात आलं आहे. सुट्टीतही ह्या व्हिडीओला अपवाद नाही.
राजगोपाल देवरा म्हणाले की, "निवासी डॉक्टरांच्या संपादरम्यान, त्यांच्याशी केलेल्या चर्चेत प्रामुख्याने समोर आलेली बाब म्हणजे डीन बऱ्याचदा रुग्णालयातील नियमित कामकाजात सहभागी होत नाहीत."
"जर रुग्णालयात पुरेसे सुरक्षारक्षक नसतील किंवा किती नातेवाईकांना रुग्णांना भेटण्याचा परवानगी असावी, याबाबत जर कोणता नियम नसेल तर ती अधिष्ठातांची चूक आहे," असं देवरा यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.
आता नियमित जबाबदारीसोबतच जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने, केईएम रुग्णालयाचे डीन अविनाश सुपे यांच्यावर परफेक्ट वाईड अँगल्स आणि क्लोजअप शॉट्स घेण्याची अतिरिक्त जबाबदारी असेल. पण महापालिका रुग्णालयाच्या अधिष्ठातांसाठी हे काम थोडं जास्त असेल. कारण त्यांना दिवसातून तीन वेळा रुग्णालयाची पाहणी करुन त्याचा व्हिडीओ बनवण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, या निर्णयामागचा हेतू योग्य असला तरी मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्नही विचारले जात आहेत.