मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सुरक्षारक्षक मंडळाच्या एक लाखाहून अधिक सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर सध्या नोकरी टिकणार की नाही याची टांगती तलवार आहे. गेल्या मे महिन्यापासून 60 हजाराहून अधिक सुरक्षारक्षकांचे करार संपले असताना देखील मंडळाने त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कोणत्याच हालचाली दाखवलेल्या नाहीत. त्यामुळे महामंडळाचे सुरक्षारक्षक चिंताग्रस्त झाले आहेत.


महाराष्ट्र राज्यातील सुरक्षारक्षक महामंडळाच्या वतीने शासकीय, निमशासकीय आणि काही खाजगी क्षेत्रात सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करण्यात येतं. गेली अनेक वर्ष हे मंडळ सक्रिय आहे. साधारण संपूर्ण राज्यात एकूण 15 जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ कार्यरत आहेत. त्याअंतर्गत 1 लाख 20 हजार सुरक्षारक्षक गेली अनेक वर्ष सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळात मे महिन्यात 60 हजाराहून अधिक सुरक्षारक्षकांचे वार्षिक करार संपुष्टात आलेले आहेत. मात्र तरीही या सुरक्षारक्षकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात विविध ठिकाणी सेवा बजावलेली आहे. असे असताना महामंडळ मात्र या सुरक्षारक्षकांचे करार पुन्हा करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.


कोरोना आणि महागाईच्या काळात सुरक्षारक्षकांना मिळणारे वेतन हे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे महामंडळाने ज्या सुरक्षारक्षकांचे करार संपुष्टात आलेले आहेत. त्यांना परत त्यांचे करार करुन त्यांना परवडेल अशी वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.


महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक हक्क संघटनेच्यावतीने महामंडळाकडे विविध मागण्यांचे निवेदन वारंवार सादर करण्यात येत आहे. मात्र या मागण्यांना महामंडळाच्या वतीने केराची टोपली दाखविण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात सुरक्षारक्षकांच्या मागण्या महामंडळांना मान्य केल्या नाहीत, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1 लाख 20 हजार सुरक्षारक्षक रस्त्यावर येतील आणि महाराष्ट्र बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.


सुरक्षारक्षकांच्या मागण्या


1) महाराष्ट्र राज्यातील मुंबईसहित असे पंधरा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ एकत्रित करुन एकच मंडळ प्रस्थापित करावे.


2) सुरक्षारक्षक महामंडळाच्या सुरक्षा रक्षक यांचा भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधी कार्यालय वांद्रे येथे जमा करावा.


3) सुरक्षारक्षक मंडळ जर शासनाअंतर्गत आहे तर मंडळाच्या सुरक्षारक्षक यांना सरकारी सुरक्षा यंत्रणेने सारखा गणवेश देण्यात यावा.


4) सुरक्षारक्षक कर्तव्यावर असताना कोरोना संसर्गजन्य रोगात शहीद झालेल्या सुरक्षारक्षकांच्या परिवाराला विमा योजना लागू करावी.


5) कर्तव्यावर असताना केईएम आणि नायर हॉस्पिटल मुंबई किंवा इतर जिल्ह्यातील सुरक्षारक्षक यांना कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असता त्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी.


6) अधिनियम 1981 खाजगी सुरक्षारक्षक (कल्याण व नियमण) च्या तरतुदीनुसार वेतन वेळेवर न देणाऱ्या नोंदीत आस्थापनांवर शासन कारवाई करावी.


7) मुंबई मंडळाचे पगार वाढीचे करार मे 2020 रोजी संपुष्टात आले आहेत. ते लवकरात लवकर देण्यात यावेत. आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.