वसई : सध्या प्रत्येक तरुणाला आपली शरीरयष्टी अभिनेत्यांप्रमाणे असावी असं वाटतं. अॅब्ज बनवण्यासाठी अनेक जण जिमला जातात, काही औषधांचं सेवन करतात. पण या औषधांचा शरीरावर किती विपरित परिणाम होऊ शकतो याचं उदाहरण मुंबईजवळच्या वसईत पाहायला मिळालं. समीर साखरेकर यांना अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवायची होती. त्यासाठी जिमचे ट्रेनर आणि आणि मित्रांनी सुचवलेलं औषध खाल्ल्यामुळे, आज त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.


37 वर्षीय समीर साखरेकर यांची अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवण्याची इच्छा. त्यासाठी ते जिममध्ये प्रचंड मेहनतही करत होते. समीर साखरेकर 2013 पासून जिममध्ये जाऊन व्यायाम करत आहेत. फुगीर मसल्स म्हणझे बॉडी फिट असा त्यांचा समज होता. बॉडीबिल्डरप्रमाणे आपल्याही शरीराचा आकार व्हावा यासाठी समीर साखरेकर यांनी जिम ट्रेनर तसंच मित्रांच्या सांगण्यावरुन फेब्रुवारी 2019 पासून स्टेरॉईड असलेली औषधं घेण्यास सुरुवात केली. समीरने इंजेक्शन, औषधे घेतली. त्यात टेस्टॉन, बोल्डी, जीएच यांसह काही फॅट बर्नर्स देखील होते. यातील बहुतांश इंजेक्शनमध्ये स्टेरॉईड मोठ्या प्रमाणात होते.


औषधं घेतल्यानंतर समीर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यासाठी ते काही काळ रुग्णालयातही दाखल झाले होते. त्यावेळी ते बरे होऊन घरी परत आले होते. पण काही महिन्यांतच म्हणजे मे पासून, त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. त्यांच्या शरीराला सूज आली, चालताही येत नव्हतं. अखेरीस त्यांना समजलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. 9 जुलैपासून त्यांचं डायलिसिस सुरु झालं. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावं लागत आहे. समीर साखरेकर हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात आज त्यांचे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. अशास्थितीत या गंभीर आजारपणाशी तोंड कसे देणार हा प्रश्न त्यांच्या घरच्या पुढे आहे.


समीर यांचं वय 37 वर्ष आहे. या वयात त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आयुष्यभर त्यांना डायलिसिस करावं लागेल. तसंच त्यांचं शरीर कमकुवतच राहिलं तर सतत इतर दुसरे लहान मोठे आजार होत राहतील. त्यामुळे प्रत्यारोपण करणे गरजेचं आहे. यासाठी त्यांना 10 ते 12 लाखांचा खर्च येणार आहे. संपूर्ण कुटुंब समीर साखरेकरांवर अवलंबून असल्यामुळे ते पैशांची जुळवाजुळव करत आहे. मात्र सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जमेल तशी मदत करण्याचे आवाहन साखरेकर कुटुंबीय करत आहेत.


स्टेरॉईड सेवनाचे परिणाम
स्टेरॉईडच्या सततच्या सेवनामुळे शरिरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. स्टेरॉईडच्या गुणवत्तेवरही आणि सेवनाच्या प्रमाणावर आजार होणं अवलंबून असतं. मात्र याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडे ठिसूळ होणे, डोळे कमजोर होणे, हेपेटायटीस होणे, छातीत दुखणे, निद्रानाश इत्यादी आजार होतात. तसेच मानसिक ताण येतो. मूड स्विंग्ज होतात, चीडचीड होते, भावनांवरील नियंत्रण सुटते इत्यादी त्रास सुरु होतात.