Maharashtra Rain : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण आज आणि उद्या हवामान विभागाने मुंबईसह कोकणला ऑरेंज अलर्ट दिलाय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह उपनगरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस कोकणसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य मान्सून कालच (19 जून 2022) रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारली आहे.