Nawab Malik Case : राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीनं (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली आहे. या आरोपपत्रात तपासयंत्रणेनं मलिकांविरोधात मनी लाँड्रिंगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी मलिकांविरोधात या गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता याप्रकरणी सुरू होणाऱ्या खटल्यात आरोपनिश्चिती केली जाईल. जर नवाब मलिकांनी त्यांच्या विरोधातले आरोप फेटाळले तर मग ते कसे निर्दोष आहेत? हे त्यांच्या वकिलांना खटल्या दरम्यान कोर्टाला आपल्या युक्तिवादातून पटवून द्यावं लागेल.
विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली.
नवाब मलिकांची नेमकी भूमिका काय?
नवाब मलिकांनी शहावली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडमधील बेकायदेशीर भाडेकरूंचा सर्व्हे करून घेतला. त्यामुळे तिथल्या अनियमिततेची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यासाठी मलिकांनी सरदार खानसह हसीना पारकरसोबत मलिकांनी अनेकदा बैठकाही केल्या. सरदार खानचा भाऊ मुनिरा प्लंबरसाठी तिथं भाडं वसुलीचं काम करायचा. सरदार खाननं ईडीला दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे 'कुर्ला जनरल स्टोअर्स' या नावानं एक गाळा अडवून ठेवला होता. ज्याची मालकी त्यांचा भाऊ अस्लम मलिकच्या नावे होती. 1992 नंतर ते दुकान बंद करण्यात आलं. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावला खान हा औरंगाबाद जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेव्हा जेव्हा पैरोलवर बाहेर यायचा तेव्हा तेव्हा नवाब मलिक, अस्लम मलिक, हसीना पारकर, सरदार खान यांच्यात बैठका व्हायच्या. गोवावाला कंपाऊंडचा जास्तीत जास्त भाग गिळंकृत करण्यासाठीचा सर्व्हेयरच्या मदतीनं मलिकांनी तिथं बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. तपासयंत्रणेला साल 2005 मधील मिळालेल्या कागदपत्रांवरून हे सिद्ध होत आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, हसीना पारकरचा मुलगा अलिशान यांनं कबूल केलंय की हसमीन पारकर ही साल 2014 मधील तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद इब्राहिमचे इथले सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायची. त्यांन हेदेखील कबूल केलंय की, हसीना पारकरनं सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडाच वाद मिटवला होता. त्यानंतर कालांतरानं ही सारा मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली.