ठाणे : बाळकूम येथील ग्लोबल कोविड रुग्णालयात कंत्राटी परिचारिका म्हणून काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाणे महानरपालिकेच्या उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्या महिलेने, त्याबाबत तक्रार करताच तिला कामावरून काढून टाकण्यात आले होते. 

Continues below advertisement


मात्र महिलेने याबाबतची तक्रार ठाणे महापालिका प्रशासन आणि विशाखा समितीकडे दाखल केली होती. तसेच भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील काल याचप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा अखेर ठाणे महापालिका उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ठाणे महानगरपालिकेचे बाळकूम येथे असलेल्या ग्लोबल कोविड रुग्णालयात 30 वर्षीय परिचारिका कार्यरत होती. या महिला परिचारिकेची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने एका वर्षांपूर्वी करण्यात आली होती. ही महिला रुग्णालयात कामावर असताना केळकर यांनी अनेक वेळा तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली होती. तसेच तिला रुग्णालयातील वेगवेगळ्या माळ्यांवर बोलावून शरीर सुखाची मागणी केली होती. त्यामुळे डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या विरोधात परिचारिकेने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. 


मात्र त्या तक्रारींवर कुठलीच कारवाई झाली नाही. या उलट पालिका प्रशासनाने सदर तक्रारदार महिलेला तिची कागदपत्र अपूर्ण असल्याचा ठपका ठेवत कामावरून घरी बसवले होते. या महिलेने मात्र त्यानंतर यासंदर्भात विशाखा समितीकडे तक्रार केली. महिलेची तक्रार मिळताच चित्रा वाघ यांनी देखील काल महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. 


अखेर बुधवारी रात्री उशिरा डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात कलम 354 (a) अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणात पुढील कारवाई कापूरबावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. मात्र अजूनही केळकर यांना अटक झालेली नाही.