मुंबई : हे सरकार आज कोसळेल का उद्या कोसळेल हे मी कधीही सांगितलं नाही. पण आपल्या वजनाने हे सरकार कोसळणार आहे. ज्या दिवशी कोसळेल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पत्रकारांशी बोलत होते.


विधानसभा अध्यक्ष निवडणूक
नियम बदलण्याची बैठक ही नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत होऊ शकते. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. पण या सरकारकडे बहुमत आहे तर मग ही उठाठेव कशासाठी? सरकार घाबरते कशासाठी? यासंदर्भात जेव्हा विषय येईल तेव्हा आमची भूमिका सांगू पण सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे हात वर करून निवडणूक घेण्याचा विषय आलेला आहे. असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही सक्षम विरोधीपक्ष आहोत पहिल्या दिवसापासून हीच आमची भूमिका आहे. आम्ही लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.


पंकजा मुंडे यांच्या विषयावर बोलण्यास टाळले
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सगळे खुलासे केले आहेत. त्यावर अधिक काही बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या मुद्द्यावर भाष्य करणं टाळलं.


छगन भुजबळ भेट



  • ओबीसी राजकीय आरक्षणा संबंधी छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

  • मी या प्रश्नात संपूर्ण मदत करीन, असे सांगितले.

  • इम्पिरिकल डेटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील चर्चा आम्ही केली.

  • आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत.

  • फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी हे करणे सहज शक्य आहे, असे मी त्यांना सांगितले.

  • भुजबळ यांनी त्याचे नेतृत्व केले तरी काही हरकत नाही कारण ते सत्तारूढ पक्षात आहेत.


भाजप अभियान
17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत आम्हाला बूथ अभियान राबवायचं आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आज आयोजित करण्यात आला आहे. यात बूथ रचना संदर्भात चर्चा होणार आहे.