मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनविसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप करत उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पदाचा राजीनामा दिला आहे.


वांद्रे पूर्वच्या वॉर्ड क्रमांक 95 मधून निवडणूक लढण्यास चित्रे इच्छुक होते. मात्र या ठिकाणी मनसेकडून सुमन तारिक यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं विभाग अध्यक्ष सुनिल हर्षे यांनी अयोग्य रितीनं तिकीट वाटप केल्याचा आरोप चित्रेंनी केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडून जाणार नसल्याचंही अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यानिमित्ताने पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

मुंबईसह दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.