मुंबई : जर काँग्रेसचा प्रचार करणार नसाल, तर अपप्रचारही करू नका, अशा शब्दात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी काँग्रेस नेत्यांना टोला हाणला आहे. नारायण राणे, कृपाशंकर सिंह, नसीम खान, गुरूदास कामत या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या प्रचारातून काढता पाय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय निरूपमांनी हे वक्तव्य केलं.
मुंबई काँग्रेसनं आज मालवणीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड या नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. गुरुदास कामत गट आणि संजय निरुपम गट अशा दोन गटांनी मुंबई काँग्रेसची अंतर्गत भांडणं जगासमोर आणली. काही वेळा तर ही भांडणं हातघाईवरही आली. त्यानंतर राणेंसारख्या वरिष्ठ नेत्यांनीही मुंबईत प्रचाराला येण्यास असहमती दर्शवली होती.