ठाणे : कल्याणमधील बिल्डर मुन्ना सिंह याने बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी आपल्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे .दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत पालिका आयुक्तांना पदावरुन दूर करा अशी मागणी करत त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. मनसे आमदार पाटील यांच्या मागणीमुळे आता या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


कल्याण पूर्वेकडील दावडी येथील सहा मजली बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, मात्र त्यानंतर देखील कारवाई केल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग याने केला. मुन्ना सिंग आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत एका हॉटेल मध्ये तब्बल सव्वा तास सुरू असलेल्या बैठकीचे सीसीटीव्ही देखील समोर आलेत. याप्रकरणी बिल्डर मुन्ना सिंग याने 'मी चुकलो माझ्यावर कारवाई केली, आता लाच घेतल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करा' अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली. 


या प्रकरणाची दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी शहानिशा करत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील दिलं होत. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. राजू पाटील यांनी सदर प्रकरणी मुन्ना सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार केडीएमसी अधिकारी दिपक शिंदे व अनंत कदम यांनी प्रत्येकी एक लाख व महापालिका आयुक्तांना देण्यासाठी 25 लाख असे एकूण 27 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. बिल्डरने वरील लाच प्रकरणात केडीएमसीचे आयुक्तांचे नाव घेणे हे अत्यंत गंभीर असून महानगरपालिकेच्या नावाला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत असून  महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी स्थानिक रहिवासी, विकासकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत.


महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीनंतर संबंधिताच्या विरोधात निश्चितपणे कारवाई करण्यात येईल अशी सारवासारव केली असली तरी वास्तविक बिल्डर मुन्ना सिंग यांनी शिंदे व कदम यांनी आयुक्तांना देण्यासाठी पैसे घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यामागे आयुक्तांचा हात असल्याची चर्चा असून चौकशीची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा आणि यासर्व प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्तांना पदावरुन दूर करा अशी मागणी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.


महत्वाच्या बातम्या :