बीड : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास पूर्णच पिकांची वाताहात लागली आहे. त्याच बरोबर या नैसर्गिक आपत्तीत 6 जण दगावले असून 29 पशुधनाची हानी झाली आहे. तर 20 ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.


बीड जिल्ह्यात 4 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याची पातळी देखील वाढली असून नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चार दिवसाच्या काळात वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंगावर भिंत पडून बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच गेवराई तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


बीड शहराजवळच्या कपिलधार येथे वाहत्या पाण्यात एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या बरोबरच पशुधनाची हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. बीडमधील केज तालुक्यात पुराच्या पाण्यात तीन बैल वाहून गेले असून धारूरमध्ये एक, आष्टीमध्ये सहा शेळ्या, दोन बैल, दोन वासरू, एक म्हैस पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पाटोदा तालुक्यात एक वगार वाहून गेले आहे, गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात एक गाय तीन बैल वाहून गेले असून जवळपास 1200 कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. तर शिरूर कासार तालुक्‍यात एक शेळी आणि 50 कोंबड्या वाहून गेल्या असून बीड तालुक्यात पाच शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. 


नांदेडमध्ये पूरपरिस्थीती, अनेक गावांचा संपर्क तुटला


नांदेड जिल्ह्यात परवा रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील अनेक भागात पूरसदृश्य परस्थिती असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर  शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.


काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. तर जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, तापी या प्रमुख नद्यासह ओढे व नाल्यांना मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. परिणामी मुखेड येथे मोती नाल्या वरून कार क्र-Mh 20 Dj 6925 ही 4 व्यक्तीसह  पुरात वाहून गेली असून त्यातील एका व्यक्तीस ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात आलेय.