ठाणे : मनसेच्या मोर्चाला भाजपची साथ असल्याच्या शिवसेनेच्या टीकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी चोख उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या राजकीय भूमिकेमुळे तळागळातील शिवसैनिक नाराज आहेत. येणाऱ्या काळात शिवसेनेला खिंडार पडेल, असं भाकीत अविनाश जाधव केलं आहे.


शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी आहे, मात्र हे सरकार राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार चालवत आहेत. असंच सुरु राहिलं तर काही दिवसांनी शिवसेनादेखील अजित पवारच चालवतील. आजच्या घडीला मुख्यमंत्री म्हणून जेवढी गर्दी उद्धव ठाकरे यांच्याकडे नसते, त्याहून कित्येक पटीने जास्त गर्दी अजित पवारांकडे असते. त्यामुळे ज्यांचा पक्ष आणि सरकार राष्ट्रवादी चालवते, त्यांनी आम्हाला शिकून नये की आमचा मोर्चा कोण स्पॉन्सर करत आहे, अशी सडकून टीका अविनाथ जाधव यांनी केली आहे.


मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांचा आरोप


उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या भूमिकेचा फटका येत्या काळात शिवसेनेला बसणार आहे. शिवसेनेला भविष्यात मोठं खिंडार पडणार आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन मोठी चूक केली आहे. हिंदुत्वाचा गळा दाबण्याचं काम त्यांनी केलं आहे. प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक शाखाप्रमूख या भूमिकेमुळे नाराज आहे. लोक उद्धव ठाकरे म्हणून शिवसेनेला मतदान करत नव्हते. प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणून शिवसेनेला मतदान करत होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या लाचारीमुळे शिवसैनिक नाराज आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मनसेमध्ये प्रवेश करतील, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.


मनसेचा महामोर्चा, मुंबईतील नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर आणि भगवे झेंडे



पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि ती राज ठाकरेंनी चोरली अशी टीका शिवसेनेकडून होत आहे. यावर बोलताना अविनाश जाधव यांनी म्हटलं की, बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरे यांनी ती भूमिका घेतली असेल तर त्यात चुकीचं काय आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या लोभापायी ती भूमिका पूर्णत: विकून टाकली आहे. त्यामुळे देशाला आणि राज्याला अपेक्षित असणारी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली, असं अविनाश भोसले यांनी म्हटलं.