मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोरोनाच्या संकटात अनेकांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी कोरोना आजारामुळे आप्तेष्ट गमावले. ज्या आपल्या तळागाळातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला, ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली, अशा कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांत्वन पत्र पाठवलं आहे. या कठीण काळातसुद्धा मी, माझे कुटुंबिय आणि मनसे पक्ष आपल्यासोबत असल्याचं या पत्रात सांगून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. स्थानिक मनसे नेते कार्यकर्ते हे राज ठाकरे यांचं पत्र पोहचवून आपल्या पक्षाच्या कार्यकर्ताला धीर देण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. राज्यतील विविध जिल्ह्यात स्थानिक मनसे नेते आपल्या कार्यकर्त्यांकडे जाऊन ज्यांच्या घरी कोरोनामुळे निधन झालं आहे. अशा आपल्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना राज ठाकरे यांनी पाठवलेले सांत्वन पत्र पोहचवत आहेत.
'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्याला या पत्रात धीर देऊन सांत्वन केलं आहे. या कोरोनाच्या परिस्थितीत ज्यांनी आपेल आप्तेष्ट गमावले, अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे शक्य नाही. पण परिस्थिती दुःखाची असली तरी आपण या काळात खंबीर राहण्याचासुद्धा या पत्रात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. हे पत्र आम्ही आमच्या जवळच्या सहकार्यांची भेट घेऊन पोहचवत आहोत', असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे यांच्या सांत्वन पत्रातील मजकूर :
आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.
परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा
आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबिय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना
ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो
आपला नम्र,
राज ठाकरे
महत्त्वाच्या इतर बातम्या :