Rahul Shewale Rape Allegations : शिवसेना खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यावर बलात्काराचा (Rape) आरोप करणाऱ्या महिलेने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे न्यायासाठी याचना केली आहे. "माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही," असं या महिलेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 


दरम्यान खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात संबंधित महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


संबंधित महिलेने ट्विटरवर हे पत्र आणि माहिती शेअर केली आहे. मात्र अद्याप असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं पोलिसांनी एबीपी न्यूजला सांगितलं. पोलीस आता या ट्विटर अकाऊंट आणि पत्राची सत्यता तपासत आहेत.






 


महिलेने पत्रात काय लिहिलं?
तक्रारदार महिलेने एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "खासदार राहुल शेवाळे लग्नाच्या बहाण्याने 2020 पासून आपल्यावर बलात्कार करत असून मानसिक त्रास देत आहेत. आपला आणि पत्नीचा कधीही घटस्फोट होऊ शकतो. आमच्या दोघांमध्ये काहीही ठीक नाही, असं राहुल शेवाळे यांनी आपल्याला सांगितलं." "शेवाळे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपण त्यांचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला," असंही या महिलेने सांगितलं.


दरम्यान राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांनुसार, "शेवाळे आणि संबंधित महिला हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनेकदा भेटले होते. राहुल शेवाळे या महिलेला जेवणासाठी बोलवायचे आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक संबंध ठेवायचे."


महिलेविरोधात साकीनाका पोलिसात गुन्हा
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या निर्देशानंतर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल महिन्यात या महिलेने खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटलं होतं. राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात संबंधित महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेच्या विरोधात साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहे.