मुंबई : हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. लातूरमध्ये कृषी नवनिर्माण 2020 चं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार होते. हे कृषी प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. पक्षाचा झेंडा बदलल्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मराठवाड्यात त्यांना पाहिजे तसा जनाधार मिळाला नाही. कारण मनसेचा झेंडा आणि विचारसरणी त्यातुलनेत शिवसेनेला मराठवाड्यामध्ये भरगोस यश मिळालं होतं. याचं कारण होतं कट्टर हिंदुत्ववाद. आता मनसेच्या झेंड्याचा रंग आणि पक्षाचे स्वरूपही बदललं आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी मराठवाड्यापासून दौऱ्याला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.


मराठवाड्यात मनसेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव होते. मात्र, नंतर त्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. कारण मनसेचा झेंडा आणि विचारसरणी. शिवसेनेला मराठवाड्यामध्ये भरगोस यश मिळालं होतं याचं कारण होतं कट्टर हिंदुत्ववाद. औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद या भागात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवली गेली. निजामाच्या काळात रजाकारीच्या वरवंट्याखाली हा भाग भरडला गेला होता. त्यामुळे या भागाची मानसिकता ही कट्टर हिंदुत्ववाद्यांची आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला या भागामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. या भागातील गावागावात अनेक लोक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्यात आनंद मानत होते. अशा भागांमध्ये मात्र मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही.

मनसेची वाटचाल हिंदुत्वाकडं -
आता मनसे झेंड्याचा रंग आणि पक्षाचे स्वरूपही बदललं आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की मला हिंदुहृदयसम्राट म्हणून नका मात्र त्यांची पावले त्याच दिशेने पडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यामध्ये अतिशय क्रेझ होती ती त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळेच. आता त्याच वाटेने राज ठाकरे निघाले आहेत. लातूरमध्ये पहिला जाहीर कार्यक्रम होतोय ते ही झेंड्याचं स्वरूप बदलल्यानंतर. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मनसेला पुन्हा उभारी घ्यायची असेल तर हिंदुत्ववाद, भगवा या शिवाय पर्याय नाही याची जाणीव राज ठाकरेंना पुरती आहे. औरंगाबाद येथील मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे परभणी येथील अशोक देशमुख, हनुमंत बोबडे पाटील, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश जाधव, संजय जाधव, हिंगोली येथील शिवाजी माने, उस्मानबादेतील रवी गायकवाड यासारख्या अनेकांना शिवसेनेनं संधी दिली आणि त्यांनी वर्षानुवर्ष शिवसेनेच्या स्वरूपात सत्तास्थानी राहण्याचं काम केलं.

मनसेकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन -
लातुरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असं हे कृषी प्रदर्शन असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी संघटनेनं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे लातूरात येणार होते. राज यांच्यामुळे विद्यार्थी सेना मजबूत होती. पण वेगळं झाल्यावर फार मोठी पडझड झाली. परिणामी राज मराठवाड्यात फारसे प्रभाव पाडू शकले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांत तुरळक यशावर मनसेला समाधान मानावे लागले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे काम चांगलं होतं. महाराष्ट्रातील पहिला नगरसेवक मनसेचा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपालिकेमध्ये निवडून आला होता. तसेच भूम तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत सुद्धा ताब्यात घेतली होती.

Raj Thackeray | 'हिंदुहृदयसम्राट' म्हणण्यास राज ठाकरे यांचा नकार का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha