Kalyan News : कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांमध्ये नागरिकांना  मोठ्या प्रमाणात  पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे आज मनसे (MNS ) आमदार राजू पाटील आणि भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
 
कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय  मॉलापासून काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेही सहभागी झाले होते.   शिवाय या मोर्चात मनसे आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. शिवाय केडीएमसी आणि आयुक्तांच्या निषेधाचे फलक होते. 


दरम्यान, आमदार पाटील आणि चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, आयुक्त हजर नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमोर संताप व्यक्त केला. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात का? असा आरोप मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार नसाल तर महापालिकेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. 


नवीन गृहसंकुलाचा पाणी पुरवठा बंद करा आणि ते पाणी गोरगरीब जनतेला द्या. महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसवा आणि पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबरोबरच 27 गावांमध्ये 200 हून जास्त टँकर पुरवले जातात, त्यामुळे हा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.  


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू असताना आजच्या तहान मोर्चात हे दोन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे ही युतीची नांदी आहे का? अशी चर्चा होत आहे. यावर बोलताना आमदार रवींद्र चव्हान म्हणाले, "आमच्या नेत्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यामुळे लोकहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत."


महत्वाच्या बातम्या