मुंबई : मुंबई मेट्रोची 2 बी ही मार्गिका जमिनीवरुन उन्नत मार्गानेच जाणार, असं एमएमआरडीएने स्पष्ट केलं. ही मार्गिका भुयारी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला काही नागरिक संघटनांनी विरोध केला आहे. मात्र संपूर्ण परिस्थितीचा सारासार विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं एमएमआरडीएने हायकोर्टात सांगितलं.

मुळात ही मार्गिका काही भागात भुयारी, काही भागात उन्नत करण्यासाठी लागणारी जागा इथे उपलब्ध नाही. तसेच उन्नत मार्ग हा भुयारीकरणापेक्षा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा आहे. जमिनीखालची मेट्रो ही थोडी थोडकी नाही तर तब्बल साडे पाचपट महाग आहे, अशी माहिती देण्यात आली.

मेट्रो रेलसाठी उन्नत मार्गाच्या एका किमीच्या उभारणीचा खर्च हा 95 कोटी रूपये इतका आहे. तर भुयारीमार्गाच्या एक किमीच्या उभारणीसाठी हाच खर्च 540 कोटी रूपये इतका आहे. तसेच मेट्रो 2 बीची उन्नत मार्गिका चार वर्षात पूर्ण होऊ शकते. मात्र याच मार्गाच्या भुयारीकरणासाठी सहा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मेट्रोचा मार्ग कोणता असावा याचा निर्णय नागरिकांनी घेऊ नये. त्यासाठी वैज्ञानिकांचे खास पथक तयार करण्यात आले आहे, असंही सांगण्यात आलं.

या याचिकेवर हायकोर्टात 13 जुलैला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती  अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

मेट्रो 2 बी च्या बांधकामाविरोधात जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट हाऊसिंग सोसायटी, गुलमोहोर एरिया सोसायटी वेलफेअर ग्रुप आणि नानावटी रुग्णालयच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मेट्रो 2 बीचं काम भूमिगत मार्गाने करण्यात यावे अशी रहिवाशांची मागणी असून खोदकामाची परवानगी न घेताच रस्ते खोदल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे.