मुंबई : प्लास्टिकबंदीमुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाल्याचं बघायला मिळतं. मुंबईतील माटुंगा इथलं कॅफे मैसूर इथलं सांबर आणि चटणी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनींसाठी दररोज इडली-सांबार-चटणी इथून पार्सल जातं.


मात्र प्लास्टिकबंदीमुळे आज त्यांच्या घरुन स्टीलचे डबे आल्याचं हॉटेल मालकाने सांगितलं. याचबरोबर बहुतांश जणांना प्लॅस्टिकबंदीमुळे इडली-सांबार पार्सल न घेता रिकाम्या हाती परतावं लागलं. एकूणच सर्वसामान्य ते श्रीमंतांना या प्लास्टिकबंदीचा फटका बसला.

प्लास्टिकबंदीनंतर ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड पॅकेज्ड प्रॉडक्ट्स विक्रीबाबत अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम आहे. उदाहरणार्थ हल्दीराम सारख्या ब्रँड्सच्या नावाने विकले जाणारे वेफर्स, शेव, चिवडा अशा प्रॉडक्ट्सवर बंदी नाही. तर दुसरीकडे स्वतः उत्पादन करून पॅकेजिंग करून विक्रीसाठी बाजारात आलेले लोकल ब्रँड्सच्या प्लास्टिकवर बंदी आहे. मात्र दुकानदारांना याबाबत शासन स्तरावर सुस्पष्टता नसल्याने ते संभ्रमात आहेत.

राज्यभरात प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली. तर नाशिकमध्येही तीन लाख 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

लोअर परेलच्या फिनीक्स मॉलमध्ये महापालिकेने धडक कारवाई केली. दिवसभर दंड न आकारता केवळ प्लास्टिक जमा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोअर परेलच्या मॉलमधील सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल, मॅकडोनल्ड यांच्यावर धडक कारवाई केली.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.

सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल यांना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर मॅकडोनल्डने दंड देण्यास नकार दिल्याने प्रशासन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. मार्केट विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी ही कारवाई केली.

सांगलीत प्लास्टिकचं एक टन साहित्य जप्त

सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केलं आहे.

यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी : कोणत्या महापालिका क्षेत्रात किती जणांवर कारवाई?