मुंबई : सर्वोच्च न्यायालायच्या (Supreme Court) निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवार (25 सप्टेंबर) रोजी आमदार अपत्रतेवर सुनावणी पार पडली. तर 'दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल राखून ठेवला', असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर होणार असल्याचं देखील यावेळी संजय शिरसाट यांनी सांगितलं. आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. परंतु विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीला दिरंगाई होत असल्याची याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
आमदार अपात्रेतवरील आजची सुनवाणी संपली असून पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून यंदाच्या वर्षात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती देखील सुत्रांकडून देण्यात आलीये. दरम्यान या सुनावणीनंतर आमदारांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.
शिरसाटांनी काय म्हटलं?
ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आजच्या सुनावणीमध्ये प्रत्येक पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आली. तर ही सुनवाणी कधी होणार याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवलाय. तसेच ही सुनावणी ऑनलाइन व्हावी असं अनेकांचं म्हणणं आहे. याबाबत अध्यक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रत्येक वकिलांना स्वतंत्र्य पुरावे द्यायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदारांची सुनावणी स्वतंत्र्य व्हावी असं वकिलांचं म्हणणं आहे.
अध्यक्ष नियमांप्रमाणे सुनवाणी घेतली - गोगावले
आमदार अपात्रेतवर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेलई बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं की, 'ठाकरे गटाने एकत्रित सुनावणीची मागणी करो किंवा ना करो, आमचे वकिल बाजू मांडतील. आम्ही अध्यक्षांना सांगू शकणार नाही की, सुनावणी पुढे ढकला. अध्यक्ष नियमाप्रमाणेच निकाल देतील. आम्ही मेरिटवर असल्यामुळे आम्हाला काळजी करण्याची गरज नाही.' तर ठाकरे गटांनी आजपर्यंत जे भविष्य वर्तवलं ते त्यांच्या विरोधात गेलं असल्याचं म्हणत भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर घणाघात केला.