Mumbai Crime News: वांद्रे वरळी सी-लिंकवर (Bandra-Worli Sea Link) जॉयराईडसाठी मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशातील महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका वाहतूक पोलिसानं वांद्रे वरळी सी-लिंकवरुन जाण्यास महिलेला रोखलं, त्यानंतर महिलेमध्ये आणि वाहतूक पोलिसांत शाब्दिक चकमक झाली अन् महिलेनं थेट एक गन काढून पोलिसाला धमकावलं. दरम्यान, ती खरीखुरी गन नसून टॉयगन असल्याचं काही काळातच लक्षात आलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली होती, पण त्यानंतर त्यांनी जामीनावर तिची सुटका करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक ट्रॅफिक पोलीस या महिलेला वरळी सी-लिंकवरुन जाण्यापासून रोखतात आणि गाडी बंद करण्यास सांगतात. तर ती महिला ट्रॅफिक पोलिसांवर अरेरावी करण्यास सुरुवात करते, मी गाडी बंद करणार नाही, मी या देशाची नागरीक आहे आणि मी टक्स भरतेय त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असं महिला ट्रॅफिक पोलिसांना सांगते. ती एवढ्यावरच थांबत नाहीतर ती, जा जाऊन नरेंद्र मोदींना फोन करा, त्यांनी जर मला सांगितलं नुपूर गाडी बंद कर, तरंच मी करणार, असं उद्धटपणे सांगत महिलेनं अरेरावी सुरू केली.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी नुपूर पटेलला अटक केली. मात्र त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. ही महिला मध्य प्रदेशातील जबलपूरची असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला वरळी-वांद्रे सीलिंकवरुन मोटारसायकलनं प्रवास करण्यास निर्बंध असल्याचं माहिती नव्हतं, आपल्या भावाला भेटण्यासाठी पटेल तिच्या मोटरसायकलवरून मध्य प्रदेशातून पुण्याला गेली होती. पुण्यातून नंतर ती मुंबईला फिरण्यासाठी आली आणि तिला वांद्रे-वरळी सी लिंक बघायचा होता. ती सी-लिंक वरून गेली आणि तेव्हा तिला पोलिसांनी अडवलं. तिला नियमांबाबत कल्पना नसल्यामुळे तिला राग अनावर झाला आणि तिनं अरेरावी केली."
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरला हा प्रकार घडला असून तिला थांबवण्यात आलं, तेव्हा ती वरळीच्या बाजूनं सी-लिंकवर आली होती. पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ती पुढे निघून गेली. मात्र पुढे उभे असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी या महिलेसंदर्भात कळवण्यात आलं आणि ती पकडली गेली. वरळी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 186, 279, 336 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेला अटक करून मोटारसायकल जप्त केली, मात्र त्याला न्यायालयात हजार करण्यात आलं असता तिची जामिनावर सुटका करण्यात आली.