मीरारोड: पहाटेपर्यंत सुरु असलेली पार्टी रोखण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांनाच तळीरामांनी डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना ठाण्यातील मीरारोडमध्ये घडली आहे. अतिरिक्त कुमक मागवून या पोलिसांची सुटका करुन, 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
मीरारोडच्या पूनम गार्डन भागात समृद्धी नावाच्या इमारतीतल्या डी 603 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु असल्याची तक्रार पहाटे पाचच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात आली. तक्रार मिळताच मीरारोड पोलिस ठाण्याचे तीन पोलिस कर्मचारी संबंधित फ्लॅटवर गेले.
आतमध्ये हुक्क्याचा धुराडा आणि मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा सुरु होता. पोलिसांनी तक्रार आल्याने गोंधळ बंद करा असं सांगितलं. त्यावर नशेत असणाऱ्या 14 जणांनी पोलिसांनाच डांबून ठेवून धक्काबुक्की करत मारहाण केली. तसंच एका पोलिसाचा मोबाईलही काढून घेतला.
यानतंर पोलिसांचा मोठा ताफा आल्यानंतर या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली. तर दोन महिलांसह 14 तळीरामांना ताब्यात घेण्यात आलं. सगळ्यांना वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.