मुंबई : मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. गुरुवार (31 ऑगस्ट) आणि शुक्रवार (1 सप्टेंबर) रोजी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या खर्चाची उजळणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडियाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर याच बैठकीचा समाचार सध्या शिंदे गटाकडून घेण्यात येत आहे. 


उदय सामंतांनी मांडला बैठकीचं खर्च


यावेळी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, "45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रॅण्ड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे."


तर जेवणाचे एक प्लेटही साडेचार हजार रुपयांची असल्याचा धक्कादायक दावा उदय सामंतांनी केला आहे. त्यामुळे जे 14 तासांसाठी 65 हजार रुपयांचा खर्च करतात त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.  


मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय : सामंत


इंडिया आघाडीवर निशाणा साधताना उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, "मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय. देशाचं नाव राजकारणासाठी वापरणं हे दुर्दैवी आहे." लोकसभा निवडणुका झाल्यावर इंडिया संपुष्टात येणार असल्याचं वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली त्यातील अनेक पक्षांचा समावेश या इंडियाच्या आघाडीमध्ये आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.  


ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या स्थानावर भाष्य 


"जी यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष 26 व्या स्थानावर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 व्या स्थानी आहे." त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 


मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन 


आज आणि उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीमध्येच इंडिया आघाडीच्या चिन्हाचं देखील अनावरण करण्यात येणार आहे. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय देखील या बैठकीमध्ये घेतले जातील. त्यामुळे सध्या सत्ताधारी पक्षाकडून इंडियाच्या या बैठकीवर घणाघात केला जात आहे. 


हेही वाचा : 


INDIA Meeting: इंडिया आघाडीची ताकद वाढली! बैठकीत आणखी दोन पक्ष होणार सामील; बैठकीआधी महाविकास आघाडीनेही केलं मोठं वक्तव्य