मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र (Maharashtra) दौरा करणार आहेत. यावेळी ते छत्रपती संभाजीनगरला देखील भेट देतील. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


मराठवाडा मुक्तिसंग्रामचं अमृत महोत्सवी वर्ष


मराठवाडा मुक्तिसंग्रामचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांना देखील अमित शाह हजेरी लावतील. दरम्यान राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण वर्षभर मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 


पुणे दौऱ्यानंतर मराठवाडा दौऱ्याचे आयोजन


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील पुणे दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पुणे दौरा केला होता. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अमित शाह यांनी पुणे दौरा केला होता. त्यातच अवघ्या दोन महिन्यांमध्येच अमित शाह हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांना राजकीय महत्त्व देखील प्राप्त झालं आहे. 


कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची विनंती


मराठवाडा मुक्तिसंग्राच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यामुळे अमित शाह जरी  मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असले तरीही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार का हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मराठवाडा मुक्तिसंग्राम


भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 565 पैकी 562 संस्थानं ही भारतात सामील झाली. मात्र तीन संस्थानांचा प्रश्न हा कायम होता. यामध्ये हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही संस्थानं सामील होती. त्यावेळी मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा भाग होता. त्यामुळे हैदराबादच्या निजामाविरोधात लढा देण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेला दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. 1938 ते 1948 या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये मराठवाड्यासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिले. अखेर निजामाने माघार घेऊन 17 सप्टेंबर 1948 मराठवाडा स्वतंत्र्य झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी भाषेच्या आधारावर मराठवाडा हा महाराष्ट्रात सामील करुन घेण्यात आला. 


हेही वाचा : 


Pew Research Center : 80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन : सर्वेक्षण