मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महापालिकेची छत्रपती शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याने यातील मासे विक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका इथं जाण्याची नोटिस काढली आहे. यामुळे कोळी बांधव, मासे विक्रेते आणि मासे शौकिनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
क्रॉफर्ड मार्केट शेजारी गेल्या चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेलं आहे. इथं मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी-विक्री दररोज होत असते. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दहा लाख लोक या मासे व्यवसायावर अवलंबून आहेत.
एक ऑगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातून हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या व्यापाऱ्यांना दिलेली आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल आणि मध्यवस्तीत असणारे हे फिश मार्केट ऐरोलीला हलवणार असल्याने इथले कोळी बांधव संतापले आहेत.
जर हे फिशमार्केट या परिसरातून हलवलं तर कोळी समाज उद्ध्वस्त होईल, अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे. मार्केट ऐरोलीला गेल्यास मासे घेणारे गिऱ्हाईक तुटेल आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊन उपासमारीची वेळ येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील वैयक्तिक ग्राहकांपासून छोटी-मोठी हॉटेल आणि कंपन्यांतील ग्राहक हे इथले मुख्य ग्राहक आहेत. या परिसरातून हे मच्छी मार्केट अन्य ठिकाणी हलवू नये असं त्यांनी सांगितलं आहे.
पालिकेच्या बाजार विभागाकडून विक्रेत्यांना आलेली नोटीस संभ्रम निर्माण करणारी
पालिकेच्या बाजार विभागाकडून विक्रेत्यांना आलेली नोटीस संभ्रम निर्माण करणारी आहे. नोटिशीमध्ये 'तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत' असे नमूद करून ऐरोली नाका येथे 'कायमस्वरूपी जागा मिळण्यासापेक्ष स्थलांतरित' असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी हे कागदी घोडे नाचवून कोळी बांधवांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे. 2014 साली मार्केट स्थलांतरित करून समोरच असणार्या महात्मा फुले फ्रुटमार्केट या परिसरात या व्यावसायिकांना जागा देण्यासंदर्भात महापालिकेने एफिडेविट दिलेले आहे. मात्र आता अचानक महापालिकेने फिश मार्केटचे आरक्षण हटवून मासे उद्योगाला उद्ध्वस्त करण्याचा कट करत असल्याचं बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी सीएसटीलगत असणारा पादचारी पूल कोसळला त्यामुळे पाच मजली असणारे छत्रपती शिवाजी महाराज मार्केटसुद्धा धोकादायक इमारत असल्याचा अहवाल महापालिकेने तयार केलेला आहे. तळमजल्यात फिश मार्केट असून इमारत सुस्थितीत असल्याचा एक ऑडिट इथल्या मासे व्यावसायिकांनी करून घेतलेला आहे. मात्र तरीही महापालिका हे मार्केट या परिसरातून हटवण्यासाठी ठाम आहे. महापालिकेविरोधात मासे विक्रेते, कोळीबांधव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज काही प्रमुख लोकांसोबत महापालिका अधिकारी बैठक करत आहेत. या बैठकीत जर निर्णय झाला नाही तर एक तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मासे विक्रेते, व्यवसायिक आणि कोळी बांधवांनी दिला आहे.
क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस, कोळी बांधव, मासे विक्रेत्यांमध्ये संताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2019 12:25 PM (IST)
एक ऑगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातून हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या व्यापाऱ्यांना दिलेली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -