नवी मुंबई : एकीकडे मुंबई पालिकेत रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अधिकाऱ्यांच्या नावाने चांगभलं सुरु असताना दुसरीकडे नवी मुंबई पालिकेतील अभियंता विभागाने रस्त्याच्या कामात तब्बल 40 कोटी वाचवल्याने त्यांची वाहवा होत आहे. मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करीत पालिकेने पाम बीच रस्त्याचे काम केले आहे. यासाठी पालिकेला 7 कोटी खर्च आला आहे. हेच काम नेहमीच्या पद्धतीने केले असते, तर 45 ते 50 कोटी रुपये खर्च आला असता.


नवी मुंबई महापालिकेने अनेक वेळा अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन शहराच्या समस्या सोडवत राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करीत आपल्या मुलभूत समस्येवर दीर्घ काळासाठी उपाय शोधले आहेत. आधुनिक पद्धतीने डम्पिंग ग्राउंड तयार करून कचऱ्याच्या विल्हेवाटाची  समस्या संपवली. पालिका अभियंता विभागाने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करतानाच खर्चही कसा वाचला जाईल याकडे लक्ष दिले आहे.

मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून रस्त्यांची कामे करण्यास सुरवात केली आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या पाम बीच मार्गावर याच टेक्नॉलॉजीचा वापर करून काम करण्यात आले. यासाठी पालिकेला 7 कोटींचा खर्च आला असून हेच काम नेहमीच्या पद्धतीने केले असते तर 45 ते 50 कोटी खर्च आला असता. त्याच बरोबर संपूर्ण रस्ता उखडून परत नवीन करायला 8 ते 9 महिन्याचा कालावधी गेला असता. मात्र फक्त 2 महिन्यात पालिकेने हे काम केले असून यामुळे रहदारीलाही कोणत्याच प्रकारचा खोळंबा आला नाही.

मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा फायदा काय ?

  • ग्रीट, सिमेंट, लहान खडीचा वापर करुन मशीनमध्ये मिश्रण केले जाते. हे मिश्रणथंड करुन परत त्याचा थर मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पसरवला जातो.

  • हे मिश्रण डांबराप्रमाणे गरम करावे लागत नसल्याने वायू प्रदूषण होत नाही.

  • रस्त्यावर ओतल्यावर ते सर्वत्र पसरवल्यानंतर अर्धा तासात सुकते. आणि 5 इंचाचा थर येतो. यावरुन लगेच वाहतूक चालू केली जात असल्याने ट्रॅफिक जॅमचा प्रश्न येत नाही.

  • मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीनुसार रस्ता बनवल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्यात न मुरल्याने त्याला खड्डे पडण्याचा संबंध नाही.

  • यात डांबराचे प्रमाण कमी आहे. यामुळेरस्त्यावर वाहने घसरुन अपघाताची शक्यता कमी होते.