Continues below advertisement


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणने (MHADA) डिजिटल युगाशी सुसंगत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलत ‘म्हाडासाथी’ (MHADA Sathi) या एआय चॅटबॉट सेवेचे (MHADA AI Chatbot) लोकार्पण केले. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी गुलजारीलाल नंदा सभागृह, म्हाडा मुख्यालय येथे या सेवेला अधिकृत सुरुवात झाली.


कार्यक्रमात बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले की, म्हाडाने नेहमीच लोकाभिमुख व पारदर्शक सेवा देण्यावर भर दिला आहे. नागरिक सुविधा केंद्र (CFC), अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली (VMS), आणि डीजी-प्रवेश या डिजिटल सेवांनंतर आता ‘म्हाडासाथी’ हा अभिनव उपक्रम नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. सुरुवातीला ही सेवा म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून लवकरच मोबाईल प्लॅटफॉर्मवरही कार्यान्वित केली जाणार आहे.


MHADA AI chatbot : चॅटबॉटची वैशिष्ट्ये


दोन भाषा : मराठी व इंग्रजी.


माहितीचा आवाका : म्हाडाच्या नऊ विभागीय मंडळांशी संबंधित सर्व माहिती.


आवाजावर आधारित सुविधा : नागरिकांना अधिक सुलभ संवादाचा पर्याय.


एआय-आधारित प्रतिसाद : वापरकर्त्यांच्या प्रश्नानुसार सातत्याने विकसित होणारी सेवा.


MHADA Sathi : कोणती माहिती मिळणार?


या चॅटबॉटद्वारे म्हाडाच्या संगणकीय सोडती, गृहप्रकल्पांची माहिती, अर्जांच्या सद्यस्थिती, निविदा सूचना, नवीन नियमावली यासह विविध महत्त्वाची माहिती नागरिकांना त्वरित मिळू शकणार आहे. कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता कमी होणार असून नागरिकांचा वेळही वाचणार आहे.


डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार


संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, नागरिक सुविधा केंद्रावर प्रतीक्षा वेळ पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या घटून आता सात ते आठ मिनिटांवर आला आहे. नागरिकांना पुढील टप्प्यात घरबसल्या दस्तऐवज अपलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सध्या म्हाडाच्या संकेतस्थळावर सुमारे 15 कोटी दस्तऐवज उपलब्ध असल्याने माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या अर्जांची संख्या घटली आहे.


या लोकार्पण कार्यक्रमास मुंबई इमारत सुधार व पुनर्विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘म्हाडासाथी’च्या माध्यमातून म्हाडा पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिककेंद्रित प्रशासन या दिशेने अधिक सक्षम पाऊल टाकत असून, भविष्यातील डिजिटल सेवांना नवा वेग मिळणार आहे.



ही बातमी वाचा: